मराठी: Unlocked Literal Bible - Marathi

Updated ? hours ago # views See on DCS

हबक्कूक

The Book of

लेखक

हबक्कूक 1:1 हबक्कूकचे पुस्तक हे संदेष्टा हबक्कूकचे दैवी कथन म्हणून ओळखले जाते. त्याच्या नावापलीकडे, आम्हाला मुळात हबक्कूकबद्दल काहीच माहिती नाही. त्याला “हबक्कूक संदेष्टा” असे म्हटले जाते, असे दिसते की तो तुलनेने सुप्रसिद्ध होता आणि त्याची आणखी ओळख पटविण्याची गरज नव्हती.

तारीख आणि लिखित स्थान

साधारण इ. पू. 612-605

दक्षिणेकडील राज्यातील यहूदा राष्ट्राची पडझड होण्याआधीच हबक्कूकने हे पुस्तक लिहिले असावे.

प्राप्तकर्ता

यहूदाचे लोक (दक्षिणेकडचे राज्य) आणि सर्वत्र देवाच्या लोकांना सामान्य पत्र.

हेतू

हबक्कूक आश्चर्यचकित झाला होता की देवाने आपल्या निवडलेल्या लोकांना त्यांच्या शत्रूंच्या हातून सध्याच्या दुःखातून जाण्याची का परवानगी दिली होती. देव उत्तर देतो आणि हबक्कूकचा विश्वास पुन्हा दिला जातो, या पुस्तकाचा हेतू आहे की, आपल्या लोकांना संरक्षक म्हणून परमेश्वर, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांकरता टिकून राहील, हे घोषित करण्यासाठी की, परमेश्वर, यहूदाचा सार्वभौम योद्धा या नात्याने बाबेलकरांचा न्याय करणार आहे. हबक्कूकचे पुस्तक आम्हांला अभिमानी लोकांचे चित्र देते, तर नीतिमान देवामध्ये विश्वासाने राहतात (2:4).

विषय

सार्वभौम देव यावर विश्वास ठेवणे

रूपरेषा 1. हबक्कूकची तक्रार (1:1-2:20) 2. हबक्कूकची प्रार्थना (3:1-19)

Chapter 1

अन्यायाबद्दल हबक्कूकची तक्रार

1 संदेष्टा हबक्कूक याला मिळालेले देववचन.

     2 “हे परमेश्वरा, मदतीसाठी मी किती वेळ आरोळी मारू,

     आणि तू ऐकणार नाहीस?

     जाचजुलमात व भयात मी तुला आरोळी मारली,

     पण तू मला वाचवत नाहीस!

     3 तू मला अन्याय

     व अनर्थ का पाहायला लावतोस?

     नाश आणि हिंसा माझ्यासमोर आहेत;

     आणि भांडण व वाद उठतो!

     4 ह्यास्तव नियमशास्त्र कमकुवत झाले आहे,

     आणि न्याय कोणत्याही वेळी टिकत नाही,

     कारण दुष्ट नितीमानाला घेरतो,

     त्यामुळे खोटा न्याय बाहेर येतो.”

खास्दी यहूदाला शिक्षा करतील

     5 “इतर राष्ट्रांकडे पाहा! त्यांचे परिक्षण करा, आणि आश्चर्याने विस्मित व्हा!

     कारण खचित मी तुमच्या दिवसात अशा काही गोष्टी करणार की, त्या तुम्हास सांगण्यात येतील तेव्हा तुमचा विश्वास बसणार नाही.

     6 कारण पाहा! मी खास्द्यांची [1] उठावनी करतो, ते भयानक व उतावळे राष्ट्र आहे.

     जी घरे त्यांची नाहीत, त्यांचा ताबा घ्यायला ते पृथ्वीच्या विस्तारावरून चाल करीत आहेत.

     7 ते दारूण व भयंकर आहेत, त्यांचा न्याय व त्यांचे वैभव ही त्यांच्यापासूनच पुढे जातात.

     8 त्यांचे घोडे चित्यांपेक्षा वेगवान आहेत आणि संध्याकाळच्या लांडग्यांपेक्षा जलद आहेत. त्यांचे घोडेस्वार दिमाखाने पुढे धावत जातात,

     आणि त्यांचे घोडेस्वार दूरून येतात, खाण्यासाठी घाई करणाऱ्या गरुडाप्रमाणे ते उडतात.

     9 ते सर्व हिंसा करण्यास येतात,

     त्यांचा जमाव वाळवंटातील वाऱ्याप्रमाणे समोर जातो, आणि ते बंदिवानास वाळूप्रमाणे गोळा करतात!

     10 म्हणून ते राजांची थट्टा करतील, आणि राज्यकर्ते त्यांच्यासाठी केवळ चेष्टा असे आहेत!

     ते प्रत्येक दुर्गाला हसतात, कारण तो धुळीचा ढीग करून तो ताब्यात घेतात!

     11 मग ते वाऱ्याप्रमाणे सुसाट्याने पार जातील व दोषी होतील, त्यांचा असा समज आहे की आमचा पराक्रम आमचा देव आहे.”

हबक्कूक परमेश्वराजवळ तक्रार करतो

     12 “हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या पवित्रा, तू प्राचीनकाळापासून नाहीस काय? आम्ही मरणार नाही.

     परमेश्वरा तू त्यांना न्यायासाठी नेमले आहे, आणि हे खडका तू त्यांना शासन करण्यासाठीच स्थापिले आहे.

     13 तुझे डोळे इतके पवित्र आहेत की त्यांना दुष्टपणा पाहवत नाही, आणि तुझ्याने वाईटाकडे दृष्टी लावली जात नाही.

     मग जे विश्वासघाती आहेत त्यांच्याकडे तू का पाहतोस?

     जो आपल्याहून नीतिमान त्यास जेव्हा दुर्जन गिळून टाकतो तेव्हा तू का शांत राहतोस?

     14 तू लोकांस समुद्रातल्या माशांप्रमाणे केले आहेस, त्यांच्यावर अधिकारी नसलेल्या जीवांप्रमाणे ते आहेत.

     15 ते त्या गळाने सर्वांना उचलून घेतात; ते आपल्या जाळ्यात त्यांना धरून घेतात

     आणि पागाने त्यांना गोळा करतात. त्यामुळे ते हर्ष करतात व मोठ्याने ओरडतात.

     16 म्हणून ते आपल्या माशांच्या जाळ्याला यज्ञ अर्पण करतात आणि आपल्या पागापुढे धूप जाळतात.

     कारण त्यापासून त्यांना पुष्ट पशूंचा वाटा आणि त्यांचे अन्न म्हणजे चरबी असलेले मांस हे मिळते.

     17 तेव्हा ते त्यांचे जाळे रिकामे करतील काय? आणि कोणतीही दया न दाखविता, ते राष्ट्रांची कत्तल करीतच राहणार काय?”


1:6 [1] बाबेल

Chapter 2

हबक्कूकला परमेश्वराचे उत्तर

     1 मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहिन आणि बुरुजावर पहारा करीन, आणि तो मला काय म्हणेल

     व माझ्या तक्रारीपासून मी कसा वळेन ते लक्षपूर्वक पाहीन.

     2 परमेश्वराने मला उत्तर दिले आणि म्हटले, “मी तुला जो दृष्टांत दाखवतो, तो स्पष्टपणे पाट्यांवर लिहून ठेव अशासाठी की जो कोणी ते वाचतो त्याने धावावे!

     3 कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी अजून राखून ठेवला आहे, शेवटी तो बोलणार व फसवणार नाही,

     जरी त्यांने विलंब केला तरी, त्याची वाट पाहा! खचित तो येणारच आणि थांबणार नाही!

     4 पाहा! मनुष्याचा आत्मा गर्विष्ठ झाला आहे, आणि स्वत:च्या ठायीच तो सरळ नाही, परंतू न्यायी आपल्या विश्वासाने वाचेल.

     5 कारण द्राक्षारस [1] तर विश्वासघात करणारा आहे, तो उन्मत्त तरूण पुरुष आहे आणि घरी राहत नाही.

     परंतू तो कबरेसारख्या आपल्या इच्छा वाढवतो, तो मृत्यूसारखा असतो, तो कधीच तृप्त होत नाही.

     तो आपल्याजवळ प्रत्येक राष्ट्र एकत्र करतो आणि आपल्यासाठी सर्व लोकांस एकत्र करतो.

दुष्टांचा धिक्कार

     6 सर्वच लोक त्याच्या विरुद्ध बोधकथा घेणार नाहीत काय, आणि त्यास म्हणीने टोमणे मारतील व म्हणतील.

     जो आपले नाही ते वाढवतो, त्यास हाय हाय! कारण किती वेळ तू घेतलेल्या प्रतिज्ञांचा बोजा वाढवशील?

         7 तुला भेवाडणारे व तुझ्यावर कडक टीका करणारे असे अचानक उठणार नाहीत काय? तू त्यांच्यासाठी बली असा होशील.

     8 कारण तू पुष्कळ राष्ट्रे लुटली आहेत, म्हणून त्या लोकांतले उरलेले तुला लुटतील,

     ते अशासाठी की, मनुष्याच्या रक्तामुळे, देश व गावे यांच्यावर केलेले जुलूम ह्यांमुळे त्या देशांतील व गावांतील लोक तुला लुटतील.

     9 ‘जो आपल्या घराण्यासाठी वाईट लाभ मिळवतो

     व त्याद्वारे अरीष्टांच्या हातातून सुटावे म्हणून आपले घरटे उंच स्थापितो, त्यास हाय हाय!’

     10 तू अनेक लोकांस मारलेस, त्यामुळे तू स्वत:च्या घरासाठी अप्रतिष्ठा तयार केली आहेस आणि आपल्या स्वत:च्या जिवा विरुद्ध पाप केले आहेस.

     11 भिंतीतील दगडसुध्दा तुझ्याविरुध्द ओरडतील आणि तुझ्या घराचे वासे त्यांना उत्तर देतील.

     12 ‘जो रक्ताने शहर बांधतो, आणि जो अन्यायाने गाव वसवितो त्यास हाय हाय!’

     13 त्या लोकांनी उभारलेले सर्व आगीत भस्मसात होईल,

     आणि राष्ट्रे केवळ व्यर्थतेसाठी थकतील, हे सैन्याच्या परमेश्वरा कडून घडून आले नाही काय?

     14 तरीही जसे पाणी समुद्राला झाकते, तशी पृथ्वी परमेश्वराच्या गौरवाच्या ज्ञानाने भरेल.

     15 ‘जी व्यक्ती आपल्या शेजाऱ्याला मद्य प्यायला लावते त्यास हाय हाय! तू आपले विष त्यामध्ये घालून त्यास मस्त करतो,’

     ह्यासाठी की त्याचे नग्नपण पाहावे.

     16 तू गौरवाने नाही तर अप्रतिष्ठेणे भरला आहेस! तू पण त्याची चव घे आणि आपली नग्नता प्रकट कर!

         परमेश्वराच्या उजव्या हातांतला प्याला तुझ्याकडे फिरत येईल, आणि तुझ्या सर्व गौरवावर अप्रतिष्ठा पसरवली जाईल.

     17 लबानोनावर केलेला जुलूम तुला झाकेल आणि पशूंचा केलेला नाश तुला भयभीत करील. कारण मनुष्याचा रक्तपात व तेथील भूमीवर, शहरांवर, आणि त्यातील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम ह्यांमुळे असे होईल.

     18 मूर्तिकाराने कोरून केलेल्या मुर्तिंमध्ये त्यास काय लाभ? कारण जो कोणी त्यास कोरतो, किंवा ओतीव मूर्ती तयार करतो, तो खोटा शिक्षक आहे,

     कारण तो जेव्हा अशा मुक्या देवांना बनवतो तेव्हा तो स्वतःच्या हस्तकृतीवर विश्वास ठेवतो, जेव्हा तो अशा मुक्या देवांना बनवतो.

     19 जो लाकडांच्या मूर्तीस म्हणतो जागा हो! किंवा दगडांच्या मूर्तीस म्हणतो ऊठ! त्यास हाय हाय! या वस्तू शिकवतील काय? पाहा! ते सोन्याने आणि चांदीने मढवले आहेत, पण त्यामध्ये मुळीच श्वास नाही.

     20 परंतु परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरात आहे, सर्व पृथ्वी त्यापुढे स्तब्ध राहो!”


2:5 [1] धन

Chapter 3

हबक्कूकची प्रार्थना

1 संदेष्टा हबक्कूकची शिगयोनोथावर प्रार्थनाः 2 परमेश्वरा, मी तुझी वार्ता ऐकली, आणि मी भयभीत झालो.

     हे परमेश्वर, तू आपले कार्य या समयामध्ये पुनर्जीवित कर;

     या समयामध्ये ते माहित करून दे.

     तुझ्या क्रोधात आमच्यावर दया करण्याची आठवण ठेव.

     3 तेमानाहून [1] देव येत आहे, पारान पर्वतावरून पवित्र परमेश्वर येत आहे, सेला.

     परमेश्वराचे वैभव स्वर्ग झाकते, आणि त्याच्या स्तुतीने पृथ्वी भरली.

     4 त्याच्या हातातली किरणे प्रकाशासारखी चमकत होते आणि परमेश्वराने तेथे त्याचे सामर्थ्य ठेवले आहे.

     5 रोगराई त्याच्या मुखासमोरून गेली, आणि मरी त्याच्या पायांजवळून निघते.

     6 तो उभा राहिला आणि पृथ्वी मापली; त्याने पाहिले आणि राष्ट्रांचा थरकाप झाला.

     सर्वकाळच्या पर्वतांचेसुद्धा तुकडे होऊन ते विखरले गेले आणि सर्वकाळच्या टेकड्या खाली नमल्या,

     त्याचा मार्ग सदासर्वकाळ आहे.

     7 कूशानचे तंबू संकटात असलेले मी पाहिले, मिद्यान देशातील कनाती भीतीने कापत होत्या.

     8 परमेश्वरा, तू नद्यांवर रागावला होतास का? झऱ्यांवर तुझा राग होता का? समुद्रावर तू भडकला होता का? म्हणूनच तू आपल्या घोड्यांवर आणि आपल्या तारणाच्या रथांवर आरुढ झाला होतास काय?

     9 तू आपले धनुष्य गवसणी बाहेर काढले आहे; तू आपल्या धनुष्यावर बाण चढवला आहे! (सेला).

     तू पृथ्वीला नद्यांद्वारे दुभागले आहे.

     10 पर्वत तुला पाहून वेदनेमध्ये वितळले!

     जलप्रवाह त्याच्यावरून चालला आहे;

     खोल समुद्राने आवाज उंचावला आहे,

     समुद्राने आपला हात [2] उंचावला आहे.

     11 चंद्र व सूर्य आपल्या जागी स्तब्ध झालेत, त्यांचे तेज लोपले. तुझे बाण सुटत असता त्यांच्या तेजाने, आणि तुझ्या झळकत्या भाल्याच्या चकाकीने ते दुर गेले आहेत!

     12 तू रागाच्या भरात पृथ्वीवरून चाल केली आणि क्रोधाने राष्ट्रे पायाखाली तुडविलीस.

     13 तू तुझ्या लोकांच्या तारणासाठी, तुझ्या अभिषिक्ताच्या तारणासाठी पुढे गेलास! तू दुष्टाच्या घराचा माथा छिन्नविछिन्न केला आहे,

     व त्याचा पाया मानेपर्यंत उघडा केला आहे, सेला!

     14 ते प्रचंड वादळाप्रमाणे आम्हास पांगवण्यास आले असता, तू त्यांचेच भाले त्यांच्या सैनीकांच्या डोक्यात भोसकले,

     गरीब मनुष्यास एकांतात खाऊन टाकावे, ह्यामध्ये त्यांची तृप्तता होती.

     15 पण तू तुझ्या घोड्यांना समुद्रातून कूच करायला लावलेस, त्यामुळे समुद्र घुसळला गेला.

     16 मी ऐकले तेव्हा माझे अंग थरथरले, माझे ओठ आवाजाने कापले! माझी हाडे कुजण्यास सुरूवात झाली आहे, आणि मी आपल्या ठिकाणी कापत आहे.

     म्हणून मी धीराने नाशाच्या दिवसाची, शत्रू आमच्यावर हल्ला करील, त्या दिवसाची वाट पाहत आहे.

     17 जरी अंजिराच्या झाडांनी फळ दिले नाही आणि द्राक्षवेलींना काही उपज आले नाही,

     जैतूनाच्या झाडाच्या उपजाने जरी निराशा झाली आणि शेतांतून अन्न उगवले नाही,

     कळप वाड्यातून नाहीसे झाले असले, गोठ्यात गाई-गुरे उरली नसली,

     18 तरी मी परमेश्वराठायी आनंद करीन, माझ्या तारणाऱ्या देवाजवळ उल्लास करीन.

     19 प्रभू परमेश्वर माझे बळ आहे,

     तो माझे पाय हरणींच्या पायासारखे करतो, आणि तो मला माझ्या उंचस्थानावर चालवील.

             (मुख्य वाजवणाऱ्यासाठी, माझ्या तंतुवाद्यावरचे गायन.)


3:3 [1] तेमान एदोम
3:10 [2] आपला हात