2 Timothy
Chapter 1
1 प्रिय तीमथ्य, मी पौल तुला लिहित आहे. जर सर्वजण देवाबरोबर एकरुप होतील तर देव त्यांना असे अभिवचन देतो की ते आता आणि सर्वकाळसाठी त्याच्याबरोबर जीवन जगतील, हे सर्वांना सांगण्यासाठी येशू मसीहाने मला प्रेषित म्हणून पाठविले आहे. 2 हे तीमथ्या, मी तुझ्यावर माझ्या स्वतःच्या मुलासारखी प्रीती करतो. देव आमचा पिता आणि आमचा प्रभू येशू मसीहा दयाळूपणे व शांतीने तुझ्यावर कृपा करो.
3 मी देवाचे आभार मानतो आणि त्याची सेवा करतो कारण जसे माझ्या पूर्वजांनी केले तसेच जे त्याला पाहिजे ते खरोखर करण्याची माझी इच्छा आहे. हे तीमथ्या, मी सर्वदा तुझ्यासाठी रात्रंदिवस प्रार्थना करण्याची आठवण ठेवतो. 4 तुला भेटण्याची मला खरोखर इच्छा आहे कारण तू माझ्यासाठी किती अश्रु ढाळलेस त्याची मला आठवण आहे. जर मी तुला पुन्हा एकदा पाहिले तर मला खूप आनंद होईल. 5 तू खरोखर येशूवर विश्वास ठेवतो हे मला आठवते! प्रथम, तुझी आजी लोईस हिने आणि तुझी आई युनीके यांनी आपले जीवन येशूला समर्पीत केले, आणि मला खात्री आहे की त्यांच्या सारखा तू देखील येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे.
6 तू येशूवर विश्वास ठेवतो म्हणून, मी तुला आठवण करून देतो की मी तुझ्यावर हात ठेवून तुझ्यासाठी प्रार्थना केल्याने तुला मिळालेल्या देवाच्या कृपादानांना पुन्हा उजाळा देवून उपयोग करण्यास सुरवात कर. 7 देवाचा आत्मा आपल्याकडे येतो तेव्हा, तो आम्हांला घाबरविण्यासाठी नाही; तर त्या ऐवजी, देवाच्या आज्ञा पाळण्याचे सामर्थ्य देण्यासाठी, त्याच्यावर व एकमेकांवर प्रीती करावी, आणि स्वतःवर नियंत्रण ठेवावे यासाठी येतो.
8 म्हणून आपल्या प्रभू येशू विषयी इतरांना सांगत असता तुला लाज वाटेल असा विचार करू नको, आणि तू माझा मित्र असल्यामुळे तुला लज्जित व्हावे लागेल असा विचार तू करू नको, कारण मी येशूवरील विश्वासामुळे तुरूंगात आहे. त्या ऐवजी, सुवार्ता सांगताना माझ्यासोबत संकटाना सामोरे जाण्यास तयार रहा. देव तुला सर्व संकटाना तोंड देण्यास तयार करील. 9 तो हे करीलच कारण त्याने आमचे तारण केले आणि आम्हांला त्याचे स्वतःचे लोक होण्यासाठी बोलाविले आहे. आमच्या कोणत्याही चांगल्या कामामुळे देवाने आम्हांला तारले नाही; या उलट, त्याने ही भेट देण्याची योजना करुन ठेवलेली होती म्हणून आम्हांला तारले! देवाने ख्रिस्त येशूला ही भेट जगाची सुरवात होण्या अगोदरच आम्हास देण्यास सांगितले होते. 10 ह्यावरून आता प्रत्येकजण पाहू शकतो की देव त्यांचेपण तारण करू शकतो, कारण आमचा तारणारा ख्रिस्त येशूने मृत्युचा नाश केला आणि सर्वांना ही सुवार्ता दाखवली, लोकांनी सदा सर्वकाळासाठी जीवन जगावे असे सत्य त्याने दिले. 11 ह्याच कारणास्तव देवाने मला प्रेषित, उपदेशक, आणि शिक्षक म्हणून पाठवायचे ठरविले. 12 ह्या कामाची लाज न धरता, मी दुःखे सहन करतो, कारण मला माहित आहे आणि मी येशू ख्रिस्तावर भरवसा ठेवला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की तो माझा त्याच्यावरील विश्वासाचे शेवटच्या दिवसापर्यंत रक्षण करण्यास समर्थ आहे.
13 तू येशूवर विश्वास ठेवून प्रीती करत असतांना, माझ्यापासून ऐकलेल्या सुवचनांचा अर्थ समजून त्यांचे अनुकरण कर. 14 देवाने तुला दिलेली सुवार्ता चांगली सांगावी म्हणून देव तुझ्यावर अवलंबून आहे. आणि जो पवित्र आत्मा आम्हांमध्ये राहतो त्याच्यावर अवलंबून राहून ह्या सुवार्तेचे रक्षण कर.
15 तुला माहित आहे की फुगल आणि हर्मगनेस सोबत, आशियातील सर्व विश्वासणाऱ्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली आहे. 16 परंतु माझी प्रार्थना आहे की प्रभूने अनेसिफराच्या कुटूंबावर दया करावी, कारण मी तुरूंगात असतांना माझ्या बंदिवासाची कोणतीही लाज न बाळगता, त्याने नेहमीच मला मदत केली. 17 त्या ऐवजी, तो जेव्हा इथे रोम शहरात आला तेव्हा, मी सापडेपर्यंत त्याने माझा शोध केला. 18 प्रभू शेवटच्या दिवशी अनेसिफरावर दया करो. इफिस शहरामध्ये त्याने मला केलेल्या प्रत्येक मदतीची तुला माहिती आहे.
Chapter 2
1 तू मला मुला सारखा आहेस. म्हणून तुला विनंती करतो की ख्रिस्त येशूने तुझ्या विषयी कृपेचे कार्य करावे म्हणून देवाने तुला सामर्थ्यवान करावे. 2 ज्या गोष्टी माझ्यापासून आणि इतरांपासून ऐकल्या आणि ज्याची साक्ष इतर अनेकांनी सुद्धा दिली त्या गोष्टी विश्वासू लोकांना आज्ञा करून शिकवण्यास सांग. 3 चांगल्या सैनिकाप्रमाणे तो दुःख सहन करतो, जसे मी ख्रिस्त येशूसाठी दुःख सहन करत आहे. 4 तुम्हाला माहित आहे की सैनिक, आपल्या सैन्याधिकाऱ्याला खूश करण्यासाठी, नागरी घडामोडी मध्ये सहभागी होत नाही. 5 त्याचप्रमाणे, खेळाडू नियमांचे पालन केल्याशिवाय शर्यत जिंकू शकत नाही. 6 आणि जो शेतकरी कठीण श्रम करतो त्याला पिकाचा प्रथम वाटा मिळाला पाहिजे. 7 मी तुला जे आताच लिहिले त्याचा विचार कर, कारण, तसे केल्याने, प्रभू तुला जे काही समजणे गरजेचे आहे ते समजण्यास सक्षम करील. 8 तू संकटातून जात असतांना, दावीद राजाचा वंशज, येशू ख्रिस्ताची आठवण ठेव. देवाने त्याला मेलेल्यातून जिवंत केले, तेच मी सुवार्तेच्या संदेशात सुद्धा सांगितले. 9 या सुवार्तेमुळे मला गुन्हेगारासारखे तुरुंगातही जावे लागले. परंतु देवाचे वचन मात्र तुरूंगात नाही. 10 म्हणून देवाने निवडलेल्यांसाठी मी आपल्या मर्जीने हा सर्व त्रास सहन करत आहे. येशूने त्यांचे ही, तारण करावे याकरिता मी हे करितो, आणि तो ज्या गौरवी जागेत आहे तिथे ते त्याच्या सोबत सर्वकाळसाठी राहतील. 11 कधी-कधी आम्ही बोलतो त्या शब्दांवर तू अवलंबून राहू शकतोस: “जर आम्ही येशू बरोबर मरण पावलो, तर त्याच्या बरोबर जगू देखील. 12 आम्ही जर सहन करतो तर, त्याच्या बरोबर राज्य देखील करू. जर आपण त्याला नाकारतो, तर तो देखील आमचा नकार करील. 13 जरी आम्ही येशू बरोबर अविश्वासू आहोत, तो निरंतर आमच्या बरोबर विश्वासू आहे; कारण तो स्वतःला नाकारू शकत नाही.”
14 देवाविषयीचे सत्य इतरांना शिकवण्यासाठी तू ज्यांची नेमणूक केली, त्यांना मी तुला सांगितलेल्या ह्या गोष्टींची आठवण करून देत जा. प्रभूसमक्ष त्यांना ताकीद दे की मूर्खपणाच्या शब्दांवर भांडत बसू नका, कारण तसे केल्याने काहीच मदत होत नाही तर ऐकणारे त्यामुळे नाश पावतील. 15 देवाला मंजुर होणारा ज्याला लाज बाळगण्याची गरज नाही, जो देवाचे वचन अचूकपणे शिकवतो असा कामकरी बनण्याचा तू प्रयत्न कर. 16 देवाचा अपमान होईल अशारितीने बोलणाऱ्या लोकांपासून दूर रहा, कारण असल्याप्रकारचे संभाषणाने देवाचा अधिक आणि अधिक अपमान होत राहतो. 17 असले विपरीत शब्द साथीच्या रोगाप्रमाणे पसरत जातात. हुमनाय व फिलेत हे दोघे असल्या प्रकारच्या कुजक्या शब्दांचे उदाहरण आहेत. 18 हे लोक सत्यापासून बहकले आहेत, आणि मृतांचे पुनरुत्थान होवून गेले आहे असे ते सांगतात. अश्याप्रकारे त्यांनी काही विश्वासणाऱ्यांना त्यांच्या विश्वासात निराश केले आहे. 19 तथापि, देवाविषयीचे सत्य कायम राहते. देवाचे सत्य हे एखाद्या इमारतीच्या भक्कम पायासारखे आहे, ज्याच्यावर कोणीतरी हे शब्द लिहिले आहेत: “जे त्याचे आहेत त्यांची प्रभूला ओळख आहे,” आणि, “जे सर्व म्हणतात की तो देवाचा आहे त्या सर्वांनी वाईट कामे करणे सोडून द्यावे.” 20 एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या घरी फक्त सोन्या चांदीचीच भांडी असतात असे नाही, तर मातीची आणि लाकडाची देखील असतात. सोन्याचांदीची भांडी ही विशेष प्रसंगी वापरली जातात. परंतु लाकडाची आणि मातीची भांडी सामान्य वेळी वापरली जातात. 21 म्हणून, जे कोणी स्वतःला त्यांच्या जीवनातील वाईट गोष्टी पासून सोडवतात ते प्रभूसाठी चांगले काम करू शकतील. ते कोणत्याही चांगल्या कार्यासाठी सज्ज असे पात्र बनतील. आणि खरे तर, प्रत्येक चांगल्या कामामध्ये, त्यांच्या धन्यासाठी विशेष काम करण्याकरिता ते अत्यंत उपयोगी ठरतील. 22 तरुण ज्या पापमय गोष्टींची इच्छा बाळगतात त्यांची तू इच्छा बाळगू नको. त्या ऐवजी, योग्य गोष्टी करण्याचा प्रयत्न कर, देवावर विश्वास ठेवून प्रेम कर व शांतीने रहा. जे प्रामाणिकपणे प्रभूची आराधना करतात त्यांच्या सहवासात रहा. 23 ज्या गोष्टी महत्वाच्या नाहीत त्याच्यावर मूर्खपणे वादविवाद करणाऱ्यांसोबत बोलू नकोस. कारण तुला माहित आहे की जेव्हा लोक मूर्खतेच्या गोष्टी विषयी बोलतात, ते भांडण करण्यास सुरवात करतात. 24 प्रभूची सेवा करणाऱ्यांनी भांडण करू नये. त्या ऐवजी, सर्व लोकांसोबत सौम्यतेने वागावे, त्यांनी देवाचे सत्य लोकांना योग्य रीतीने शिकवावे, त्यांनी सर्व लोकांसोबत धीराने वागावे. 25 म्हणजेच, जे त्यांच्याशी उद्धटपणे वागतात त्यांना त्यांनी सौम्यतेने उत्तर द्यावे. कदाचित त्यामुळे देव त्यांना पश्चाताप करण्याची संधी देईल व त्यांना सत्य समजेल. 26 त्याच प्रकारे सैतानाद्वारे रचलेल्या सापळ्या सारखे जे आहे त्यातून ते सुटतील. सैतानाला जे पाहिजे ते त्यांच्या कडून करून घेता यावे याकरिता त्याने त्यांना फसविले आहे.
Chapter 3
1 प्रभू येण्याच्या शेवटच्या काळाच्या अगोदर, फार भयंकर काळ असणार आहे, हे तुला माहित असावे अशी माझी इच्छा आहे. 2 लोक इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा स्वत: वर खूप प्रीती करतील. ते पैशांवर प्रेम करतील. ते स्वतःचा अभिमान बाळगतील. ते गर्विष्ठ असतील. ते इतरांचा अपमान करतील. ते आपल्या पालकांचा सन्मान करणार नाहीत. ते कोणाचाही कोणत्याही गोष्टींबद्दल आभार मानणार नाहीत. ते देवाचा आदर करणार नाहीत. 3 ते आपल्या स्वतःच्या कुटूंबावर प्रेम करणार नाहीत. ते कोणाशीही शांतीने राहण्यास नकार करतील. ते इतरांची चुगली करतील. ते स्वतःला आवरणार नाहीत. ते इतरांबाबत कठोर असतील. जे चांगले आहे त्यावर ते प्रेम करणार नाहीत. 4 ज्याचे त्यांनी रक्षण करायला पाहिजे त्याचा ते घात करतील. कसलाही विचार न करता ते भयंकर गोष्टी करतील. ते गर्विष्ठ होतील, देवावर प्रीती करण्याऐवजी ज्या गोष्टी त्यांना संतुष्ट करतात त्या गोष्टी ते करतील. 5 ते देवाचा आदर करणारे वाटतील, परंतु देव खरोखर देऊ इच्छितो असे सामर्थ्य स्विकारण्यास ते नाकारतील. अश्या लोकांपासून दूर रहा. 6 ते मूर्ख स्त्रियांना बहकावून त्यांनी आपल्या घरात यावे असे करतील. व नंतर ते त्या स्त्रियांस फसवतील. त्यामुळे त्यांना जे हवे ते त्यांच्याकडून करून घेतील. या स्त्रिया सर्व वेळ पाप करीत राहतील. त्याकरिता ते अशा माणसांच्या मागे जातील आणि त्यांना आवडेल अशा वाईट गोष्टी ते करत राहतील. 7 या स्त्रियांना अनेक नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा असेल, परंतु खरोखर जे सत्य आहे ते कधीही शिकू शकणार नाहीत. 8 यान्नेस व यांब्रेस यांनी असेच मोशेला अडविले होते, हे लोक सुध्दा लोकांना त्याचप्रमाणे सत्याचे पालन करण्यापासून अडवीत आहेत. यांचे विचार भ्रष्ट झाले आहेत. ते विश्वासाच्या बाबत फसवणारे आहेत. 9 मात्र, जे काही ते करतात त्यात फारसे यशस्वी होणार नाहीत, ज्या प्रमाणे इस्त्राएल लोकांनी पहिले की, यान्नेस व यांब्रेस हे मूर्ख होते, त्याचप्रमाणे बहुतेक सर्वांना हे दिसेल की त्यांना काही समजत नाही.
10 तीमथ्या, मी जे तुला शिकविले त्याचे तू अनूकरण केले आहे. तू माझे जीवन जगणे पहिले आहे. मला देवाची सेवा कशी करायची आहे हे तू पहिले आहे. मी त्यावर कसा विश्वास ठेवतो हे तू पाहिले आहे. तू हे पण पाहिले आहे की, त्रासात असतांना सुध्दा मी शांत कसा असतो. मी देवावर व विश्वासनाऱ्यांवर किती प्रेम करतो. तू हे पण पहिले आहे की देवाची सेवा करणे कितीही कठीण असले तरी मी ते करीतच राहतो. 11 लोकांनी माझा कसा छळ केला हे तू पहिलेच आहे. अंत्युखियात, इकुन्यांत, आणि लुस्त्र यात मी कसा प्रत्येक प्रकारे छळला गेलो हे तू पहिलेच आहे. माझा त्या भागात खूपच छळ झाला आहे, परंतु प्रभूने मला त्या सर्व छळातून बाहेर आणले आहे. 12 मात्र, जे येशू ख्रिस्ताचा आपल्या वागण्यातून आदर करतात त्या प्रत्येकाचा ते तसाच छळ निश्चितच करतील. 13 दुष्ट व खोटारडे लोक अधिक दुष्ट होत जातील. ते सत्यापासून लोकांना बहकवतील व इतरांना सुध्दा सत्यापासून दूर घेऊन जावू देतील. 14 परंतु ज्याप्रकारे तुझ्यासाठी, ज्या गोष्टी करण्याचे तू शिकला आहेस त्या मात्र तू करीतच रहा, आणि ज्या गोष्टींवर तू विश्वास ठेवला आहेस त्या गोष्टी बरोबर आहेत. कारण मी ह्या गोष्टी तुला शिकविल्या आहेत, ह्याची आठवण कर. 15 जेव्हा तू लहान होता तेव्हाच, देव शास्त्रात काय सांगतो हे तू शिकलास ह्याची आठवण कर. आपण जेव्हा ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा, तो आमचे तारण करतो हे तुला शिकवू शकते. 16 सर्व शास्त्रभाग हे देवाच्या आत्म्यापासून आले आहेत, म्हणून आम्ही देवाचे सत्य शिकण्यासाठी ते वाचले पाहिजे. लोकांना देवाच्या सत्यावर विश्वास ठेवता यावा यासाठी आम्ही ते वाचले पाहिजे. जेव्हा लोक पाप करतात तेव्हा त्यांची सुधारणा करण्यासाठी देखील वाचले पाहिजे. जे योग्य आहे ते कसे करता येईल हे लोकांना शिकवण्यासाठी वाचले पाहिजे. 17 आम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून देव प्रत्येक विश्वासणाऱ्याला प्रशिक्षीत करू शकेल आणि जे काही त्याला पाहिजे ते प्रत्येक चांगल्या गोष्टी करतील.
Chapter 4
1 जेव्हा लवकरच येशू ख्रिस्त राज्य करावयास येईल, तेव्हा तो जिवंत व मेलेल्यांचा न्याय करणार आहे. आणि आता देवासमोर मी तुला आदेश देतो की, 2 येशूच्या वचनाची घोषणा कर. हे करणे जेव्हा सोपे आहे व हे करणे सोपे नाही तरी सुध्दा हे करण्याची तयारी ठेव. जेव्हा लोकांनी काही अयोग्य केले तेव्हा योग्य काय आहे हे त्यांना पटवून सांग. पाप न करण्याविषयी त्यांना ताकीद दे. येशूचे अनुकरण करण्यासाठी त्यांना उत्तेजन दे. त्यांना शिकवीत असतांना तू त्याचे पालन करीत रहा, व त्यांनी अधिक चांगले करावे म्हणून धीर धर. 3 हे मी तुला यासाठी सांगून ठेवतो, कारण देव जे खरोखरच शिकवितो ते न करणारे लोक आपल्या मध्ये असतील अशी वेळ येत आहे. त्या ऐवजी, त्यांना जे करणे बरे वाटते असे शिकविणारे लोक ते शोधतील. या प्रकारे, ते नवीन व वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी शिकतील. 4 ते सत्य ऐकण्याचे थांबवतील, व ते काल्पनिक गोष्टी कडे लक्ष देतील. 5 परंतु हे तीमथ्य, जसे तुझ्यासोबत, काही जरी झाले तरी स्वत: वर नियंत्रण ठेव. कठीण व त्रासदायक गोष्टी सहन करण्याची तयारी ठेव. सुवार्ता सांगण्याचे काम करीत रहा. देवाची सेवा करण्याचे काम पूर्ण कर. 6 मी तुला ह्या गोष्टी सांगतो, कारण मी लवकरच मरणार आहे आणि हे जग सोडून जाणार आहे. मी वेदीवर अर्पण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्याल्या सारखा आहे. ज्याला ते देवासाठी यज्ञ म्हणून ओतणार आहेत. 7 आपल्या शर्यतीत उत्तम करणाऱ्या खेळाडू सारखा मी आहे. मी आपली धाव संपविली आहे. देवाचे आज्ञा पालन मी उत्तम प्रकारे केले आहे. 8 आता माझ्यासाठी बक्षिस वाट पाहत आहे. कारण मी आपले जीवन देवासाठी योग्य रीतीने जगलो आहे. प्रभू माझा योग्य रीतीने न्याय करणार आहे. तो जेव्हा परत येईल तेव्हा ते बक्षिस मला लवकरच देणार आहे. व जो प्रत्येक व्यक्ती त्याच्या येण्याची उत्कंठेने वाट पाहतो त्या सर्वांना सुध्दा तो देईल.
9 तीमथ्या, माझ्याकडे लवकर येण्याचा प्रयत्न कर. 10 देमास मला मागे सोडून थेस्सलनीकास गेला, कारण त्याला या जगाचे सुख जास्त प्रिय वाटले. क्रेस्केस गलतीयास गेला, व तीत दालमतियास गेला. 11 केवळ लूक माझ्या सोबत अजूनही आहे. येतांना मार्कला तुझ्याबरोबर माझ्याकडे घेऊन ये. त्याची मला खूप मदत होणार आहे म्हणून तेवढे मात्र नक्की कर. 12 तुखिकाला मी इफिसला पाठविले आहे. 13 त्रोवासात कार्पा कडे माझा अंगरखा राहिला आहे, तो मात्र येतांना घेऊन ये. पुस्तके देखील घेऊन ये, जे विशेषकरुन जनावरांच्या त्वचे पासून बनवण्यात आली आहे. 14 धातूचे काम करणारा आलेक्सांद्र माझ्याशी वाईट रीतीने वागला आहे. त्याने जे केले आहे त्याबद्दल प्रभू त्याला शिक्षा देईल. 15 तू देखील त्याच्या पासून सावध रहा. कारण आपला प्रचार थांबविण्यासाठी त्याने शक्य तो प्रयत्न केला आहे. 16 मी पहिल्यांदा जेव्हा न्यायालयात उभा राहिलो आणि माझ्या कार्याचे स्पष्टीकरण दिले, तेव्हा कोणत्याही विश्वासणाऱ्याने मला हिम्मत दिली नाही. ते सर्व दूर उभे राहिले. देव त्यांना त्यासाठी जबाबदार न धरो. 17 प्रभू मात्र माझ्या सोबत उभा राहिला आणि मला सहाय्य केले. सर्व परराष्ट्रीय लोकांनी ऐकावे म्हणून व त्याच्या वचनाची पुर्णपणे घोषणा करावी या साठी त्याने मला हिम्मत दिली. अशाप्रकारे देवाने माझा मृत्यु होण्यापासून बचाव केला. 18 ते माझ्या विरुध्द करीत असणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीतून प्रभू माझा बचाव करील. तो राज्य करणाऱ्या स्वर्गात तो मला सुरक्षित घेऊन जाईल. लोक त्याचा सर्वकाळ गौरव करोत. आमेन. 19 प्रिस्का आणि अक्विल्ला यांना सलाम सांगा. अनेसिफराच्या कुटूंबातील लोकांना सलाम सांगा. 20 एरास्त करिंथ शहरात राहिला. त्रफिम याच्या विषयी, तो आजारी पडल्याने मी त्याला मिलेत शहरात सोडून आलो आहे. 21 हिवाळ्या पूर्वी येण्याचा प्रयत्न कर. यूबूल, पुदेस, लीन, आणि क्लौदिया व सर्व बंधू सुध्दा तुला सलाम सांगतात. 22 प्रभू तुझ्या आत्म्या सोबत राहो. तुम्हा सर्वांसोबत त्याची कृपा राहो. आमेन.