मराठी: Unlocked Dynamic Bible - Marathi

Updated ? hours ago # views See on DCS

Titus

Chapter 1

1 प्रिय तीत,

मी देवाचा सेवक, आणि येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल आहे. मी देवाच्या लोकांनी त्याच्यावर अधिक विश्वास ठेवावा यासाठी मदत करण्याचे काम करतो. देवाने आम्हा सर्वांना त्याचे लोक होण्यासाठी निवडले आहे व त्यांना खरोखर देवाला संतोषकारक जीवन कसे जगावे हे कळावे याकरिता मदत करण्याचे काम मी करतो.

2 आपण सर्वकाळ जिवंत राहण्यासाठी देवाने अभिवचन दिले आहे, ह्याची त्यांना खात्री पटली आहे म्हणून आपण तसे जीवन जगले पाहिजे, हे त्याचे लोक शिकू शकतील. देव खोटे बोलत नाही. कारण जगाची स्थापना होण्यापूर्वीच, त्याने सार्वकालीक जीवनाचे अभिवचन आपल्याला दिले. 3 मग, योग्यवेळी, त्याचे वचन त्याने सर्वांना समजण्यासाठी सोपे केले, कारण त्याचा संदेश सांगण्यासाठी त्याने माझ्यावर भरवसा ठेवला आहे. आमचे तारण करणाऱ्या देवाकडून मिळणाऱ्या आज्ञेचे पालन करण्यासाठी मी हे करतो.

4 हे तीत, तू तर मला मुलासारखा आहेस कारण आपण दोघेही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहोत. देव जो पिता आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याची दया व शांती तुझ्यावर निरंतर राहो.

5 मी तुला करण्यासाठी सांगितल्याप्रमाणे, अपूर्ण राहिलेले काम तू करावे आणि प्रत्येक शहरातील विश्वासणाऱ्यांच्या गटावर वडीलजणांची नेमणूक देखील करावी; म्हणून मी तुला क्रेत बेटावर ठेवले आहे.

6 आता प्रत्येक वडील ज्याच्यावर कोणीही टिका करू शकणार नाही असा असावा. त्याला केवळ एकच पत्नी असावी, त्याची मुले देवावर विश्वास ठेवणारी असावी, आणि लोकांना त्याची मुले आज्ञा न मानणारी किंवा वाईट अशी निदर्शनांस येवू नयेत. 7 जो कोणी देवाच्या लोकांना चालवितो तो देवाच्या घराचे व्यवस्थापन करणाऱ्यासारखा आहे. यासाठी अशा व्यक्तीची प्रतिष्ठा चांगली असणे गरजेचे आहे. तो गर्विष्ठ नसावा, तो शीघ्रकोपी नसावा, कोणत्याच कारणासाठी बराच काळ राग धरणारा नसावा. तो वादविवाद आणि भांडण करण्याची आवड असलेला आणि दारुडा व लोभी व्यक्ती नसावा.

8 त्याऐवजी, तो चांगल्या गोष्टींची आवड धरणारा व अनोळखी व्यक्तींचे स्वागत करणारा असावा. सर्वदा प्रामाणिक आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणारा, नेहमी सत्य सांगणारा व लोकांना चांगली वागणुक देणारा असावा. कोणतेही विचार किंवा काम करतांना, प्रत्येक वेळेस त्याने देवाविषयी विचार करावा, आणि त्याने पाप करणे टाळावे. 9 ज्या सत्य गोष्टी आम्ही त्याला शिकवल्या त्यांवर त्याने सर्वदा विश्वास ठेवावा आणि त्यानुसार जीवन जगावे. हे त्याने लोकांचे मन वळवण्यासाठी करावे, आणि जे अशा प्रकारे जीवन जगू इच्छीत नाहीत त्या लोकांमध्ये सुधारणा करण्यासाठीही हे करावे.

10 कारण असे पुष्कळ लोक आहेत जे विशेषतः ख्रिस्ताचे अनुकरण करणाऱ्यांना सुंता करून घेण्यासाठी सांगतात व त्यांना स्वतःवर कोणतेही नियंत्रण नको म्हणून मी तुला ह्या गोष्टी सांगत आहे. त्यांचे बोलणे व्यर्थ आहे. ते लोकांना मूर्ख बनवतात आणि चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यास भाग पाडतात. 11 ह्या लोकांना अशा प्रकारची शिकवण विश्वासणाऱ्यांना देता येऊ नये ह्यासाठी तू व ज्या पुढाऱ्यांना तू नेमणार आहेस त्यांनी त्यांना प्रतिबंधित करावे. ते जे करतात ते शिकवण्याचा त्यांना काही अधिकार नाही. लोकांनी त्यांना पैसे द्यावेत ह्यासाठी ते अशा गोष्टी शिकवतात. हे अतिशय लजिरवाणे आहे! संपूर्ण कुटूंबांनी चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवावा असे देखील ते करतात.

12 क्रेत येथील एक मनुष्य, ज्याला त्याचे लोक संदेष्टा समजत होते तो म्हणाला, ‘क्रेत येथील लोक नेहमी एकमेकांविषयी खोटे बोलतात! ते घातक जंगली प्राण्यांसारखे आहेत! ते आळशी आहेत आणि ते नेहमीच अतिशय जास्त अन्न सेवन करतात.’ 13 तो जे काही बोलला ते खरे आहे, तर मग जे योग्य ते तुम्ही त्यांना जोर देवून शिकवा, जेणे करुन त्यांनी विश्वास ठेवावा आणि देवाविषयी योग्य त्या गोष्टी शिकवाव्यात.

14 ह्या लोकांनी यहुद्यांच्या निरर्थक कहाण्यांवर व ज्या आज्ञा देवापासून नव्हेत तर मनुष्यापासून आलेल्या आहेत, त्यावर आपला वेळ वाया घालवू नये. हे लोक सत्यापासून मागे फिरले आहेत.

15 जर एखाद्याचे विचार किंवा इच्छा पापमय नसतील, तर तो सर्व गोष्टींना उत्तम असे पाहतो. परंतु जो कोणी दुष्ट आहे आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही, त्याला सर्व गोष्टी अशुद्ध करणाऱ्या असतात. असे लोक घाणेरड्या प्रकारे विचार करतात आणि ते दुष्टतेने वागण्याचा निर्णय करतात. 16 आम्ही देवाला ओळखतो, असा ते दावा करतात, परंतु त्यांच्या कामावरुन असे दिसते की, ते त्याला ओळखत नाहीत. इतर लोकांना ते किळसवाणे वाटतात. ते देवाची अवज्ञा करतात आणि त्याच्यासाठी काहीही चांगले करू शकत नाही.

Chapter 2

1 परंतु तीत, लोकांना देवाविषयीच्या सत्यावर विश्वास ठेवण्यास मदत होईल अशा गोष्टी तू शिकवल्याच पाहीजेत. 2 वृद्ध पुरुषांनी सर्वदा स्वतःवर संयम ठेवावा. इतर लोक त्यांचा सन्मान करतील असे जीवन त्यांनी जगावे, आणि त्यांनी सुज्ञपणे बोलावे. त्यांनी देवाविषयीच्या सत्य गोष्टींवर विश्वास ठेवावा, इतरांवर खरी प्रीती करणारे आणि अशा गोष्टी सतत करत राहणारे देखील असावेत.

3 पुरूषांप्रमाणेच, वृद्ध स्त्रियांनीही, त्या देवाचा अतिशय आदर करतात हे प्रत्येकाला कळेल असे जीवन जगावे. त्यांनी इतर लोकांविषयी निंदात्मक गोष्टी बोलू नये, आणि त्यांनी अधिक प्रमाणात द्राक्षारसाचे सेवन करू नये. परंतु त्यांनी इतरांना जे काही चांगले ते शिकवावे. 4 अश्याप्रकारे, त्यांनी तरुण स्त्रियांना, शहाणपणाने विचार करण्याचे आणि आप-आपल्या पतींवर व मुलांबाळांवर प्रीती करण्याचे शिक्षण द्यावे. 5 तसेच वृद्ध स्त्रियांनी तरुण स्त्रियांना उत्तम विचारांचे मनन करणे, कोणत्याही पुरूषाप्रती वाईट न वागणे, घरी चांगले काम करण्याचे आणि त्यांचे पती त्यांना जे सांगतील ते त्यांनी ऐकावे असे शिक्षणही द्यावे. कोणीही देवाच्या वचनाची थट्टा करू नये यासाठी त्यांनी ह्या सर्व गोष्टी कराव्यात.

6 आणि तरुण पुरूषांबाबतीत, तर त्यांनाही शिकव. त्यांना स्वत:वर चांगले नियंत्रण ठेवण्यास सांग. 7 माझ्या मुला तीत, तू तर, इतर लोकांना चांगली कामे कशी करावीत हे नेहमी दाखवून देत जा; तसेच विश्वासणाऱ्यांना देवाविषयी सत्य व जे काही चांगले आहे, हे तू प्रामाणिकपणे शिकवले असे त्यांना दाखवून दे. 8 कोणालाही टिका करता येणार नाही अशा प्रकारे लोकांना शिकव जेणेकरून जर कोणी तुला थांबवू इच्छितो, तर इतर लोक त्याला लाजवतील, कारण त्यांच्या जवळ आपल्या विषयी वाईट बोलण्यासाठी काहीच नसेल.

9 गुलामीत असलेल्या आमच्या बंधूंविषयी आणि त्यांच्या कुटूंबीयांविषयी: त्यांनी नेहमी त्यांच्या धन्याच्या अधीन असावे. शक्य होईल तेवढे, त्यांनी प्रत्येक बाबतीत असे जीवन जगावे की त्यांचा धनी संतुष्ट होईल आणि त्यांनी त्यांच्या सोबत वादविवाद करू नये. 10 त्यांनी आपल्या धन्यांपासून अगदी लहानशा वस्तूंचीही चोरी करू नये; त्याऐवजी, त्यांनी त्यांच्याशी विश्वासू राहीले पाहिजे, आणि त्यांनी सर्व काही अशा प्रकारे करावे की, आमच्या तारणकर्त्या देवाविषयी आम्ही जे सर्व काही शिकवले, त्याची लोकांमधे प्रशंसा व्हावी.

11 तीत, जे सर्व काही मी आतापर्यंत लिहिले आहे, त्याचा सारांश असा: त्यांचे तारण व्हावे अशी देवाची इच्छा आहे, हे समजण्यासाठी आता प्रत्येकजण सक्षम झाला आहे. त्यांच्यासाठी हा त्याचा उपहार आहे. 12 देवापासून आलेली ही तारणाची कृपा आम्हांला प्रशिक्षीत करते की, आम्ही ह्या जगात आढळणाऱ्या इच्छांना नाही म्हणणाऱ्या मुलांप्रमाणे असावे. आम्ही ह्या जगात जीवन जगत असतांना योग्य पद्धतीने विचार करावा, प्रामाणिक राहावे, सत्यावर चालण्यास, आणि दुसऱ्या लोकांशी चांगले वागण्यास आणि सर्वदा देव आमच्या विचारात आणि कृतीत असण्यासाठी ते आम्हांला मदत करते. 13 आणि त्याचवेळेस, देव जे काही भविष्यात निश्चितपणे करणार आहे, ते जे काही आहे ते आम्हांला अतिशय आनंदित करणार आहे, त्याची आम्ही वाट पाहावी असे तो आम्हांला शिकवतो: ते हे आहे, येशू मशीहा, आमचा उद्धारकर्ता आणि सामर्थ्यशाली देव, जो महान वैभवाने आमच्याकडे परत येईल.

14 आमच्या निर्बंध स्वभावातून मुक्त करण्यासाठी, प्रेमळ संतती बनवण्यासाठी, त्याने शुद्ध केलेली मौल्यवान प्रजा, व असे लोक ज्यांचा मोठा आंनद सर्व चांगली कृत्ये करण्यात आहे असे बनविण्यासाठी त्याने स्वतःला मरणासाठी खंडणी देवून आम्हाला मुक्त केले आहे.

15 तीत, ह्या गोष्टीविषयी बोल. जे तुझे ऐकतात त्यांना मी वर्णन केल्याप्रमाणे जगण्यासाठी विनंती कर. आणि आपल्या बंधु-भगिणींना सुधारण्याची आवश्यक असल्यास तुझ्या अधिकाराचा पुर्णपणे वापर कर. जे तू सांगशिल त्याचे कोणीही उल्लंघन करू नये.

Chapter 3

1 तीत, आपल्या समाजाला चालवणारे नियम व कायदे यांचे, शक्य होईल तेवढे पालन करावे अशी आपल्या लोकांना नक्की आठवण करुन दे. प्रत्येक संधीत चांगले ते करता यावे म्हणून आपण आज्ञाधारक व तयार असण्याची गरज आहे. 2 आपण कोणाविषयीही अपमानास्पद शब्द बोलू नये किंवा लोकांबरोबर वादविवाद करू नये. स्वतःचेच बोलणे खरे ठरवण्यापेक्षा इतर लोकांना प्राधान्य द्यावे आणि प्रत्येकाला सभ्यतेने वागवून घ्यावे हे चांगले आहे.

3 कारण एके काळी आम्ही सर्व ह्या गोष्टींबाबत विचारहिन आणि निरुपयोगी होतो. विविध वासनांच्या आहारी गेलो होतो आणि जणू काय आम्ही त्यांचे गुलाम असल्याप्रमाणे सुखविलासाची सेवा केली. आम्ही एकमेकांची इर्षा आणि वाईट करण्यामध्येच आमचे जीवन व्यतित केले. लोकांनी आमचा तिरस्कार करावा असे आम्ही होतो आणि आम्ही एकमेकांचा तिरस्कार करत होतो.

4 परंतु जेव्हा आमच्या तारणाऱ्या देवाची सर्व लोकांसाठीची दया आणि प्रीती प्रकट झाली तेव्हा, 5 त्याने आम्हांला आतून स्वच्छ धुऊन, आम्हास नविन जन्म देवून, आणि पवित्र आत्म्याच्याद्वारे आम्हांस नविन करून आमचे तारण केले. आम्ही चांगले काम करतो म्हणून त्याने आमचे तारण केले नाही तर, तो दयाळू आहे म्हणून त्याने आमचे तारण केले आहे.

6 येशू मसीहाने आमचे तारण केले त्यावेळी देवाने आम्हांस उदारपणे त्याचा पवित्र आत्मा दिला. 7 त्याने हा उपहार देऊन, त्याच्या व आमच्यामध्ये सर्व काही यथायोग्य केल्याचे देवाने जाहिर केले. आणि त्यापेक्षाही अधिक, जे प्रभू येशू आम्हांला देणार आहे ते सर्व काही, विशेष करून त्याच्याबरोबर सार्वकालीक जीवन आम्ही प्राप्त करू.

8 हे विधान विश्वसनिय आहे. ह्या सर्व गोष्टींना महत्त्व देऊन तुम्ही त्या सतत करत राहाव्यात, अशी माझी इच्छा आहे जेणे करून देवाने पूर्वी नेमून दिलेल्या गोष्टींना करण्यास नेहमी स्वतःला अर्पण करावे. ह्या सर्व गोष्टी प्रत्येकांसाठी उत्कृष्ट व फायदेशीर आहेत.

9 पण मूर्खपणाचे वादविवाद, गोंधळून टाकणाऱ्या यहुद्यांच्या वंशावळ्या, आणि धार्मिक कायद्यांच्या संबंधित वाद, ह्यांपासून दूर रहा. या सर्वांमुळे तुझी शक्ती व वेळ व्यर्थ वाया जाईल. 10 जर तू एक किंवा दोन वेळा इशारा देवूनही लोक ह्या फुट पाडणाऱ्या कृत्यांमध्ये जाणीवपूर्वक सहभागी होत असतील तर, त्यांच्यासोबत पुढे काही संबंध ठेवू नको, 11 कारण तसल्या प्रकारचे लोक सत्यापासून फिरले आहेत; ते पापात जगतात आणि स्वतःस दोषी ठरवितात.

12 मी अर्तमाला किंवा तुखिकाला तुजकडे पाठवले म्हणजे होईल तितके करून माझ्याकडे निकपलिसास निघून ये, कारण तेथे हिवाळा घालवण्याचा मी निश्चय केला आहे. 13 जेना कायदेपंडित व अपुल्लो यांना त्यांच्या प्रवासाकरिता आवश्यक होईल तितक्या तयारीने पाठव.

14 आपले लोक इतर लोकांच्या गरजा पूर्ण करतील असे चागंले कामधंदे शिकतील ह्याची खात्री कर. जर ते असे करतील तर ते देवासाठी फळ उत्पन्न करतील.

15 तीत, माझ्याबरोबरचे सर्वजण तुला सलाम सांगतात. जे लोक विश्वासातील बंधूसारखे आम्हांवर प्रीती करतात त्यांना ही सलाम सांग. तुम्हासर्वांबरोबर कृपा असो. आमेन.