योहानाचे पहिले पत्र
Chapter 1
1 जगात काहीही अस्तित्वात येण्याअगोदर जो होता, त्याच्या विषयी मी योहान, तुम्हाला लिहित आहे! त्याने शिकवत असतांना आम्ही प्रेषितांनी ज्याला ऐकले हा तोच होता! आम्ही त्याला पाहिले! आम्ही स्वतः त्याच्याकडे पाहिले आणि त्याला स्पर्श केला! सार्वकालीक जीवनाबद्दलचा उपदेश शिकवणारा केवळ तो एकटाच होता. 2 (कारण तो येथे पृथ्वीवर आला आणि आम्ही त्याला पाहिले, ज्याला आम्ही पाहिले तोच एक सर्वदा जिवंत आहे त्याची आम्ही तुम्हाला स्पष्टपणे घोषणा करतो. तो अगोदर पासून त्याच्या पित्यासोबत स्वर्गात होता, परंतु तो आम्हां मध्ये राहण्यासाठी आला.)
3 तुम्ही आमच्याशी जोडले जावे म्हणून आम्ही ज्या एकाला पाहिले आणि ऐकले, त्या येशूबद्दलच्या उपदेशाची घोषणा आम्ही तुम्हाला केली. आम्ही ज्याच्या सोबत एकदाच जोडले गेले आहोत तो आमचा देव पिता आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हे आहेत. 4 ह्या गोष्टी खऱ्या आहेत अशी तुम्ही खात्री करून घ्यावी, आणि ह्याचा परिणाम म्हणजे आम्ही पुर्णपणे आनंदीत व्हावे, म्हणून मी तुम्हाला हे लिहित आहे.
5 ख्रिस्तापासून आम्ही जो संदेश ऐकला आणि ज्याची आम्ही तुम्हाला घोषणा करतो तो हा आहे: तो कधीच पाप करत नाही. तो एका अति तेजस्वी प्रकाशासारखा आहे त्याच्याठायी मुळीच अंधकार नाही. 6 जर आम्ही देवाबरोबर एकत्र जोडले गेल्याचा दावा करतो, परंतु आपले जीवन अपवित्र रीतीने जगतो, तर ते वाईट प्रकारच्या अंधकारात जीवन जगल्या सारखे आहे. आम्ही खोटे बोलतो. देवाच्या खऱ्या संदेशाला अनुसरून आम्ही जीवन जगत नाही. 7 परंतु देव जसा सर्व मार्गात पवित्र रीतीने जगतो तसे, पवित्र रीतीने जीवन जगणे, हे देवाच्या प्रकाशात जीवन जगण्यासारखे आहे. जर आम्ही असे करतो तर, आपण एकमेकांसोबत एकत्र जोडले जाऊ शकतो, आणि येशू आमच्यासाठी मरण पावला म्हणून देव आम्हाला क्षमा करील आणि आमचा स्विकार करील.
8 आम्ही कधीच पाप केले नाही असे जे कोणी म्हणतात ते स्वतःलाच फसवत आहेत, आणि देव त्यांच्या विषयी जे काही बोलला त्यावर विश्वास ठेवण्यास ते नाकारतात. 9 परंतु देव जे काही करण्याचे तो बोलतो ते सर्वदा करतो, आणि तो जे काही करतो ते नेहमीच योग्य असते. म्हणून आम्ही पाप केले आहे असे जर आपण त्याच्याजवळ कबूल केले तर, तो आम्हाला आमच्या अपराधांसाठी क्षमा करील आणि आम्ही केलेल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीच्या दोषीपणाच्या भावनेतून आम्हाला मुक्त करील. ह्या कारणास्तव, आम्ही पाप केले आहे असे आम्ही त्याच्या समोर कबूल करायला हवे. 10 जे कोणी म्हणतात त्यांनी कधीच पाप केले नाही, ते देव खोटे बोलत असल्या सारखे बोलतात, कारण सर्वांनी पाप केले आहे असे देव म्हणतो! देव आमच्या विषयी जे काही बोलला त्याला ते नाकारतात!
Chapter 2
1 माझ्या स्वतःच्या मुलासारखे तुम्ही जे मला प्रिय आहात, तुम्ही पाप करण्यापासून दूर राहावे म्हणून मी तुम्हाला हे लिहित आहे. परंतु तुम्हा विश्वासणाऱ्यांपैकी कोणी पाप करतो तर, प्रभू येशू ख्रिस्त जो एक नीतिमान, त्याच्यासाठी आम्हाला क्षमा करण्याकरीता तो पित्याकडे विनंती करत आहे, ह्याची आठवण ठेवा. 2 येशू ख्रिस्ताने स्वेच्छेने त्याच्या स्वतःच्या जिवनाचे आमच्यासाठी अर्पण होऊ दिले, जेणेकरून त्याचा परिणाम म्हणजे देवाने आमच्या अपराधांची क्षमा करावी. होय, देव आमच्या अपराधांची क्षमा करू शकतो, परंतु केवळ आमच्याच नाही! तर प्रत्येक ठिकाणातील लोकांच्या अपराधांची देखील क्षमा करण्यासाठी तो सक्षम आहे!
3 आम्हाला देव ठाऊक आहे ह्याची खात्री आम्ही कशी करू शकतो हे मी तुम्हाला सांगतो. त्याने आम्हाला जे काही करण्याची आज्ञा दिली तीचे जर आम्ही पालन केले तर, त्यावरून दिसून येईल की आम्ही त्याच्यासोबत एकत्र जोडलेले आहोत.
4 “आम्ही देवाला ओळखतो,” असे जे कोणी म्हणतात, आणि देवाने आम्हाला जे काही करण्यास आज्ञापिले त्याचे आज्ञा पालन करत नाही, ते लबाड आहेत. देवाच्या सत्य संदेशानुसार ते त्यांचे जीवन जगत नाहीत. 5 परंतु देवाने जे काही करण्यास आज्ञापिले त्याचे जे कोणी आज्ञापालन करतात ते प्रत्येक मार्गात देवावर प्रीती करणारे लोक आहेत. आम्ही देवाबरोबर जोडलेले आहोत त्याची ह्याद्वारे आम्ही खात्री करू शकतो. 6 देवाला पाहिजे तसे जीवन आम्ही जगत आहोत असे जर आम्ही म्हणत असलो, तर आम्ही ख्रिस्ताने केल्याप्रमाणे आमचे जीवन जगायला हवे.
7 प्रिय मित्रांनो, तुम्ही काहीतरी नवीन करणे आवश्यक आहे म्हणून मी तुम्हाला लिहित नाही. त्याऐवजी, तुम्ही ख्रिस्तामध्ये प्रथमच विश्वास ठेवला तेव्हापासून ज्या गोष्टी करण्याचे तुम्हाला ठाऊक आहे, त्याच मी तुम्हाला लिहित आहे. तुम्ही नेहमी ऐकत आलेल्या संदेशाचा हा एक भाग आहे. 8 परंतु ह्याच मुद्यावर मी पुन्हा तुमच्याशी काही गोष्टी बोलणार आहे: मी तुम्हाला काहीतरी नवीन करण्यासाठी सांगत आहे, असेही मी म्हणू शकतो. हे नवीन आहे कारण ख्रिस्ताने जे काही केले होते ते देखील नवीनच होते, आणि तुम्ही जे काही करत आहात तेही नवीनच आहे. हे यासाठी कारण तुम्ही वाईट करणे थांबवत आहात आणि तुम्ही अधिकाधिक चांगले करत आहात. रात्र निघून जाऊन दिवस उजाडतो, तेव्हा ख्रिस्ताचा खरा दिवस उजाडावा असे हे आहे.
9 जे कोणी आपल्या सहविश्वासू बांधवांपैकी एखाद्याचा द्वेष करतात, मात्र प्रकाशात जगणाऱ्या लोकांसारखे आम्ही पण जगतो असा दावा करतात, ते अजून देखील अंधकारात जगणाऱ्या लोकांसारखे आहेत. 10 परंतु जे कोणी आपल्या सहविश्वासू बांधवावर प्रीती करतात ते प्रकाशात जगणाऱ्या लोकांसारखे वागतात; पाप करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही कारण नाही. 11 कोणी आपल्या सहविश्वासू बांधवाचा द्वेष करतो तर तो अजूनही अंधारातच जीवन जगत आहे, देवा विषयीचे सत्य काय आहे ह्याची त्याला जाणीव नाही.
12 जणुकाय तुम्ही माझी स्वतःची मुले होता ज्यांच्यावर मी प्रीती करतो त्या तुम्हाला मी हे लिहित आहे. ख्रिस्ताने तुमच्यासाठी जे काही केले आहे त्यामुळे देवाने तुमच्या पापांची क्षमा केली आहे. 13 तुम्ही जे इतरांपेक्षा वयस्कर विश्वासणारे आहात त्या तुम्हाला मी हे लिहित आहे. ख्रिस्त सर्वदा जिवंत आहे, त्याला तुम्ही ओळखता. तरूण पुरुषांनो; जो दुष्ट त्या सैतानाला तुम्ही हरवले आहे, म्हणून मी तुम्हाला देखील लिहित आहे. आणि तुम्ही लहान मुलांनो, देव जो पिता ह्याला तुम्ही ओळखता म्हणून मी तुम्हाला लिहित आहे. 14 मी पुन्हा तेच सांगेन तुम्ही वयस्कर पुरुषांनो ख्रिस्त जो सर्वदा अस्तित्वात आहे, हे तुम्हाला समजले आहे, म्हणून मी तुम्हाला लिहित आहे. आणि तरूण पुरूषांनो, तुम्ही त्या दुष्ट सैतानाला पराभूत केले आहे. आणि तुम्ही सशक्त आहात आणि देव जी काही आज्ञा देतो तसे तुम्ही वागता म्हणून मी तुम्हाला लिहित आहे.
15 देवाचा सन्मान न करणाऱ्या जगातल्या लोकांसारखे वागू नका; ते ज्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात त्या गोष्टींची इच्छा धरू नका. ते करतात तसे कोणीही जीवन जगत असेल तर, निश्चितच ते आपला देव जो पिता ह्याच्यावर प्रीती करत नाही. 16 कारण ज्या सर्व चुकीच्या गोष्टी लोक करतात, त्या सर्व गोष्टी ज्या लोक पाहतात आणि स्वतःसाठी मिळवण्याचा प्रयत्न करतात, आणि त्या सर्व गोष्टी ज्या विषयी ते बढाई मारतात, ह्या सर्व गोष्टींचा आपल्या स्वर्गीय पित्याशी काही संबंध नाही, म्हणून मी हे लिहितो. ते जगाचे आहेत. 17 जगातील जे लोक देवाचा सन्मान करत नाहीत, त्यांनी इच्छा धरलेल्या गोष्टींसोबत, त्यांचा देखील नाश होईल. परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे जे कोणी करतात ते सर्वकाळ जगतील.
18 तुम्ही मला अतिप्रिय आहात, येशू पृथ्वीवर परत येण्या अगोदर. ख्रिस्त मीच आहे असा ढोंग करणारा तो व्यक्ती येत आहे, हे तुम्ही अगोदरच ऐकले आहे; प्रत्यक्षात, अशा प्रकारचे अनेक व्यक्ती अगोदर पासूनच आलेले आहेत, परंतु ते सर्व ख्रिस्ताच्या विरोधात आहेत. ह्या कारणामुळे, ख्रिस्त लवकरच परत येईल हे आम्हाला समजते. 19 ह्या लोकांनी आपल्या मंडळ्यांमध्ये राहणे नाकारले, परंतु खरोखर पहिल्या पासूनच ते कधीच आपल्याशी संबंधित नव्हते. आम्हाला ते सोडून गेले, तेव्हा ते कधीही आमच्यात सामील झाले नाहीत हे आम्ही अगदी स्पष्टपणे पाहिले.
20 परंतु तुमच्यासाठी, ख्रिस्त जो एकच पवित्र आहे, त्याने तुम्हाला त्याचा आत्मा दिला आहे; त्याच्याच आत्म्याने, तुम्हाला सर्व सत्य शिकवले आहे. 21 देवाबद्दलचे सत्य तुम्हाला ठाऊक नाही म्हणून, मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे असे नाही, परंतु यासाठी की ते काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे. देव आम्हाला असत्य असे काहीही शिकवत नाही हे देखील तुम्हाला माहीत आहे; तर त्याऐवजी, जे काही सत्य आहे तेच तो आम्हाला शिकवतो.
22 येशू हा ख्रिस्त आहे हे जो कोणी नाकारतो तोच सर्वात वाईट खोटारडा आहे. कारण जे लोक असे करतात ते ख्रिस्ताविरुद्ध आहेत, कारण ते पिता व पुत्रावर विश्वास ठेवण्यास नकार देतात. 23 येशू हा देवाचा पुत्र आहे हे जे कोणी कबूल करत नाही ते कोणत्याही प्रकारे पित्याशी जोडलेले नाहीत, परंतु ख्रिस्त देवाचा पुत्र आहे हे जे कोणी स्वीकार करतात ते देखील पित्या बरोबर जोडलेले आहेत.
24 तर, तुमच्यासाठी, तुम्ही प्रथम ऐकले होते त्या येशू ख्रिस्ताच्या सत्यावर तुम्ही नेहमी विश्वास ठेवला पाहिजे, आणि त्या नुसारच जीवन जगले पाहिजे. जर तुम्ही असे कराल तर तुम्ही पिता आणि पुत्र ह्यांच्या बरोबर जोडून राहाल. 25 आणि देवाने आपल्याला जे सांगितले आहे ते म्हणजे आम्ही सर्वकाळासाठी जिवंत राहावे असे त्याने केले आहे!
26 ख्रिस्ता विषयीच्या सत्या संबंधी जे कोणी तुम्हाला फसवू पाहतात त्यांच्या बाबतीत तुम्हाला चेतावणी देण्यासाठी मी तुम्हाला हे लिहिले आहे.
27 जसे तुमच्यासाठी, देवाचा आत्मा ज्याला तुम्ही ख्रिस्तापासून प्राप्त केले, तुमच्यात तो कायम राहो. तुमचा शिक्षक व्हावे म्हणून तुम्हाला इतर कोणाचीही गरज नाही. तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे, अशा सर्व गोष्टी देवाचा आत्मा तुम्हाला शिकवत आहे. तो सर्वदा सत्यच शिकवतो आणि जे काही खोटे आहे ते तो कधीही बोलत नाही. म्हणून त्याने तुम्हाला शिकवल्या नुसार राहा, आणि त्याच्या बरोबर जोडलेले असा.
28 आता, माझ्या प्रियांनो, तुम्ही ख्रिस्ताशी जडून राहावे अशी मी विनंती करतो. तो पुन्हा परत येईल तेव्हा तो आमचा स्विकार करील अशी आम्हाला खात्री करता येईल अशाप्रकारे आम्हाला ते करण्याची गरज आहे. जर आम्ही असे केले तर, तो येईल तेव्हा त्याच्या समोर उभे राहण्यासाठी आम्हाला लाज वाटणार नाही. 29 ख्रिस्त सर्वदा जे योग्य आहे तेच करतो हे तुम्हाला माहीत आहे, सर्व जण जे काही योग्य आहे ते निरंतर करीत राहतात ते देवाची मुले होतात हे तुम्हाला माहीत आहे.
Chapter 3
1 आमच्या पित्याने आमच्यावर केवढी प्रीती केली या विषयी विचार करा! आम्ही त्याची मुले आहोत असे म्हणण्याची त्याने आम्हाला परवानगी दिली! आणि हे खरोखरच सत्य आहे! परंतु देव कोण आहे हे अविश्वासणाऱ्या लोकांना समजलेच नाही. आम्ही देवाची मुले आहोत, म्हणून आम्ही कोण आहोत हेही त्यांना समजत नाही. 2 प्रिय मित्रांनो, हल्ली आपण देवाची मुले आहोत तरी सुध्दा, आम्ही भविष्यात कशा सारखे असणार आहोत हे अजून त्याने आम्हाला दाखवले नाही. तथापि, ख्रिस्त पुन्हा परत येईल तेव्हा, आम्ही त्याच्या सारखे होऊ, कारण आम्ही त्याला समोरा समोर पाहू, हे आम्हाला ठाऊक आहे. 3 म्हणून खरोखर ख्रिस्त जसा आहे तसाच त्याला पाहण्यासाठी जे कोणी खात्रीशीर अपेक्षा बाळगतात त्या सर्वांनी, ख्रिस्त जसा कोणत्याही प्रकारे पाप करत नाही तसेच स्वतःला प्रत्येक मार्गात पाप करण्यापासून दूर ठेवावे.
4 परंतु प्रत्येकजण जो निरंतर पाप करत राहतो तो देवाच्या नियमांचे पालन करण्यास नकार देतो, कारण देवाच्या नियमांचे पालन करण्यास नाकार देणे, म्हणजेच पाप करणे होय. 5 आमच्या पापांचा दोष पूर्ण पणे काढून टाकण्यासाठी ख्रिस्त आला होता हे तुम्हाला ठाऊक आहे. त्याने कधीच पाप केले नाही हे देखील तुम्हाला ठाऊक आहे. 6 त्यांनी काय करावे अशी जी ख्रिस्ताची इच्छा आहे त्यानुसार जे कोणी निरंतर जगतात, ते वारंवार पाप करत नाही. मात्र जे कोणी वारंवार पाप करतात त्यांना ख्रिस्त कोण आहे, हे समजले नाही, किंवा खरोखर ते त्याच्या सोबत जोडलेले नाहीत.
7 माझ्यासाठी तुम्ही अतिप्रिय आहात, म्हणून तुम्हाला मी विनंती करत आहे, तुम्ही पाप करणे ठिक आहे असे सांगून कोणालाही तुम्हाला फसवू देऊ नका. तर जे काही योग्य आहे ते तुम्ही सर्वदा करत राहाल तर, ख्रिस्त जसा नीतिमान आहे, तसे तुम्ही त्याच्या सारखे नीतिमान आहात. 8 परंतु, जर कोणी वारंवार पाप करीत राहतो तर तो सैतानाप्रमाणे आहे, कारण सैतान हा जगाच्या सुरुवातीपासूनच सदोदीत पाप करत होता. आणि सैतानाने जे काय केले आहे त्याचा नाश करावा म्हणून देवाचा पुत्र मनुष्य झाला हे त्याचे कारण होय.
9 लोक जर देवाची मुले झाले तर ते वारंवार पाप करणार नाहीत. देवाने त्यांना त्याची मुले बनवले आहे म्हणून ते सतत पाप करू शकत नाहीत, आणि जसा तो स्वतः आहे त्यामध्ये त्याने त्यांना ठेवले आहे. 10 सैतानाच्या लेकरापेक्षा जी देवाची मुले स्पष्टपणे भिन्न आहेत. सैतानाची मुले कोण आहेत हे आम्ही जाणून घ्यावे असा एक मार्ग आहे: जे लोक जे काय योग्य आहे ते करीत नाहीत तर ते देवाची मुले नाहीत. आणि जे आपल्या सोबती विश्वासणाऱ्यावर प्रीती करीत नाहीत तर ते देवाची मुले नाहीत.
11 आम्ही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे हा संदेश तुम्ही पहिल्यांदा ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवला होता तेव्हा ज्या संदेशाला तुम्ही ऐकले होते तो हाच आहे. 12 आदामाचा पुत्र, काईन, जो त्या दुष्ट सैतानाशी संबंधित आहे, त्या दुष्टाप्रमाणे आपण इतरांचा द्वेष करू नये. कारण काईन आपल्या धाकट्या भावाचा द्वेष करायचा, म्हणून त्याने त्याचा खून केला. त्याने त्याच्या भावाचा खून का केला त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. काईन हा सवयीप्रमाणे एका दुष्ट मार्गाने वागला, आणि त्याचा धाकटा भाऊ योग्य मार्गाने वागला म्हणून त्याने आपल्या धाकट्याचा द्वेष केला हे कारण होते. 13 अविश्वासू लोक तुमचा द्वेष करतात तेव्हा तुम्ही आश्चर्यचकित होऊ नये. 14 देवाने आपल्याला त्याच्याबरोबर सदासर्वकाळ जगण्यासाठी बनवले आहे, कारण आम्ही आपल्या सहविश्वासू बांधवांवर प्रीती करतो हे आम्हाला माहितच आहे. जो कोणी त्यांच्यावर प्रीती करीत नाही त्या कोणालाही देव मृत असे मानतो. 15 जे आपल्या सहविश्वासू बांधवांचा द्वेष करतात, त्यांना देव ते खुनी आहेत असे मानतो. आणि खुनी माणसाला सार्वकालिक जीवन राहत नाही हे तुम्हाला माहितच आहे. 16 ख्रिस्त हा त्याच्या स्वतःच्या स्वेच्छेने आम्हासाठी मरण पावला हे लक्षात ठेवून आम्ही आपल्या सहविश्वासू बांधवांना खरोखर प्रीती कशी करायची हे आम्हाला त्या मार्गाने आता समजते. म्हणून त्याप्रमाणे, आम्ही आपल्या सहविश्वासू बंधुसाठी काहीही करायला हवे, अगदी त्यांच्यासाठी जीव दिला पाहिजे. 17 या जगात आम्हाला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी आपल्यापैकी पुष्कळांजवळ आहेत. जर आमच्या कोणत्याही सह-बांधवांना ज्याची गरज आहे आणि ती त्यांच्याजवळ नाही याची जाणिव आम्हाला झाली आणि जर आम्ही त्यांना प्रदान करण्यास नकार दिला तर आम्ही तसे केल्याने आम्ही देवावर प्रीती करत नाही हा दावा करतो हे स्पष्ट आहे. 18 माझी ज्यावर फार प्रीती आहे त्या तुम्हाला मी सांगतो, आम्ही एकमेकांवर प्रीती करतो केवळ एवढेच आम्ही म्हणू नये; तर आम्ही एकमेकांना मदत करून एकमेकांवर प्रीती करूया!
19 आम्ही आपल्या सहविश्वासू बांधवांवर खरोखर प्रेम करतो तर आपण ख्रिस्ताविषयीच्या खऱ्या संदेशानुसार जगत आहोत याची खात्री आम्ही बाळगू शकतो. परिणामी, देवाच्या उपस्थितीत आम्ही अपराधी आहोत असे वाटणार नाही. 20 आम्ही आत्मविश्वासाने प्रार्थना करू शकतो, कारण आम्ही चूक केली आहे म्हणून जरी कदाचित आम्ही दोषी आहोत असे आम्हाला वाटत असले तरी आम्हाला देवावर भरंवसा ठेवता यावा म्हणून तो आम्हाला पात्र बनवतो. आमच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट त्याला माहित असते.
21 प्रिय मित्रांनो, आम्ही पाप केले आहे म्हणून आमचे मन आम्हाला दोष देत नाही, तर तेव्हा आम्ही देवाजवळ आत्मविश्वासाने प्रार्थना करू शकतो. 22 आणि आम्ही आत्मविश्वासाने त्याला प्रार्थना करतो आणि त्याच्याकडे काही गोष्टीसाठी विनंती करतो, तेव्हा आम्हाला ते प्राप्त होते कारण त्याने जे काय करण्याची आज्ञा केली आहे ते आम्ही करतो. आणि त्याला ज्याने संतुष्टी मिळते कारण आम्ही ते करतो.
23 त्याने आम्हाला काय आज्ञा दिली आहे ते मी तुम्हाला सांगतो: येशू ख्रिस्त हा त्याचा पुत्र आहे यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. ज्याप्रमाणे त्याने आम्हांला जे करावे म्हणून आज्ञा केली आहे त्याप्रमाणे आम्ही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. 24 देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे करणारे देवासोबत जुळले गेले आहेत, आणि देव त्याच्यांसोबत जुळला गेला आहे. आणि आमच्याजवळ त्याचा आत्मा आहे, त्याने तो आम्हाला दिला आहे, म्हणून देव आमच्यासोबत जुळला आहे याची खात्री आम्ही बाळगू शकतो हे त्याचे कारण आहे.
Chapter 4
1 प्रिय मित्रांनो, बरेच लोक त्यांचे खोटे संदेश लोकांना शिकवत आहेत. परंतु देवापासून आलेले सत्य ते तुम्हाला शिकवत आहे किंवा नाही हे तुम्हाला समजण्यासाठी, ते तुम्हाला शिकवतात तेव्हा तुम्ही काय ऐकता त्याविषयी तुम्ही काळजीपूर्वक विचार करायला हवा. 2 कोणीतरी एखादा देवाच्या आत्म्यापासून आलेले सत्य शिकवत आहे किंवा नाही हे कसे ओळखावे हे मी तुम्हाला सांगतो. येशू ख्रिस्त आमच्यासारखा मणुष्य होण्यासाठी देवापासून आला होता ह्यावर जे कोणी ठाम असतात ते देवापासून आलेला संदेश शिकवतात. 3 परंतु येशूच्या सत्याला जे कोणी पुष्टी देत नाहीत ते देवापासून आलेला संदेश शिकवत नाहीत. ख्रिस्ताला विरोध करणारे ते शिक्षक आहेत. अशा प्रकारचे लोक आम्हांमध्ये येत आहेत हे तुम्ही ऐकले आहे. आता सुध्दा ते अगोदरपासूनच येथे आहेत!
4 मला जे अतिप्रिय आहात त्या तुम्हासाठी, तुम्ही देवाचे आहात, कारण जो महान देव आहे, तो त्याची इच्छा आहे तसे करण्यास तुम्हाला सक्षम करतो म्हणून, ते लोक काय शिकवतात त्यावर विश्वास ठेवणे तुम्ही नाकारले आहे, कारण तुम्ही देवाचे आहात. 5 जे काही चुकीचे आहे ती शिकवण देणाऱ्यांसाठी, जगातील जे सर्व लोक देवाचा सन्मान करण्यास नाकार देतात, त्यांच्या बरोबरचे ते आहेत. म्हणूनच ते जे काही बोलतात ते अशाच लोकांपासून येते, आणि त्यांच्या सारखेच लोक त्यांचे ऐकतात. 6 आमच्यासाठी, आम्ही देवाचे आहोत. जो कोणी देवाला ओळखतो तो आम्ही काय शिकवतो ते ऐकतो, परंतु जो कोणी देवाचा नाही तो आम्ही जे शिकवतो त्यावर विश्वास ठेवत नाही. अशाच प्रकारे देवाचे सत्य शिकवणारा, आणि जो कोणी इतरांना फसवतो अशा लोकांमध्ये आपण फरक करू शकतो.
7 प्रिय मित्रांनो, देव आम्हाला एकमेकांवर प्रीती करण्यास सक्षम केले आहे, म्हणून आम्ही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे, आणि जे कोणी आपल्या सह विश्वासू बांधवावर प्रीती करतात म्हणून ते देवाची मुले होतात आणि ते त्याला ओळखतात. 8 सर्व लोकांवर प्रीती करणे हा देवाचा स्वभाव आहे. म्हणून जे कोणी आपल्या सहविश्वासू बांधवावर प्रीती करत नाही तर ते देवाला ओळखत नाहीत.
9 देव आमच्यावर प्रीती करतो हे त्याने आम्हाला कसे दाखवले आहे ते मी तुम्हाला सांगतो: त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला पृथ्वीवर राहण्यासाठी, व त्याच्याद्वारेच आम्हाला सर्व काळ जगण्यासाठी सक्षम करावे म्हणून पाठवले. 10 आणि दुसऱ्या व्यक्तीवर खरे प्रेम करणे म्हणजे नेमके काय तेही देवाने आम्हाला दाखवले आहे: आम्ही देवावर प्रीती केली असे नाही, तर देवाने आमच्यावर प्रीती केली असा याचा अर्थ आहे. आम्ही पाप केल्यावर देवाने आम्हाला क्षमा करावी म्हणून त्याने त्याच्या पुत्राला स्वतःचे अर्पण करण्यासाठी पाठवले.
11 प्रिय मित्रानो, जसे देवाने आमच्यावर प्रीती केली तशीच, आम्हीही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे!
12 देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. तरीसुद्धा जर आम्ही एकमेकांवर प्रीती करतो तर, देव आमच्यामध्ये राहतो हे स्पष्ट आहे, आणि जशी तो आमच्याकडून अपेक्षा करतो तशीच आम्ही एकमेकांवर प्रीती करावी. 13 देव आम्हांबरोबर जोडलेला आहे आणि आम्ही देवा बरोबर जोडलेले आहोत याची आम्ही कशी खात्री करू शकतो हे मी तुम्हाला सांगतो: त्याने आपला आत्मा आमच्यामध्ये ठेवला आहे. 14 देवाच्या पुत्राला आम्ही प्रेषितांनी पाहिले आहे, आणि जगाच्या लोकांना त्यांच्या पापांमुळे होणाऱ्या सदासर्वकाळच्या दुःखापासून वाचविण्यासाठी पित्याने त्याला पाठवले हे आम्ही इतरांना कळकळीने सांगतो.
15 म्हणून जे कोणी येशू बद्दल सत्य बोलतात, की तो देवाचा पुत्र आहे, ते देवा बरोबर जोडून राहतील, आणि देव त्यांच्या बरोबर जोडून राहिल. 16 देवाने आमच्यावर किती प्रीती केली ह्याची आम्ही प्रचिती घेतली आहे, आणि देव आम्हावर प्रीती करतो ह्यावर आम्ही विश्वास ठेवतो. परिणामी, आम्ही इतरांवर प्रीती करतो. कारण लोकांवर प्रीती करणे हा देवाचा स्वभाव आहे, म्हणून जे कोणी निरंतर इतरांवर प्रीती करीत राहतात ते देवा बरोबर जोडलेले आहेत, आणि देव त्यांच्या बरोबर जोडलेला आहे.
17 आम्ही इतरांवर अखंड प्रीती करावी. आणि आम्ही असे केले तर, देव आमच्यावर न्याय करण्याची वेळ येईल तेव्हा तो आमच्यावर दोष लावणार नाही, ह्याची आम्हाला खात्री असेल. जसा ख्रिस्त स्वतः देवाबरोबर जोडलेला आहे, तसे आम्ही ह्या जगात जगत असता देवा सोबत जोडलेले आहोत म्हणून त्याविषयी आम्हाला खात्री होईल. 18 आम्ही देवावर खरोखर प्रीती करत असलो तर आम्ही त्याच्या विषयी भीती बाळगणार नाही, कारण जो कोणी देवावर अखंड प्रीती करतो तर शक्यतो त्याने त्या विषयी भीती बाळगूच नये. तो आम्हाला शासन करील असा आम्ही विचार करत असलो तरच आम्ही भीती बाळगणार. म्हणून देवामुळे जे भयभीत आहेत ते निश्चितच देवावर अखंड प्रीती करत नाही.
19 देवाने प्रथम आम्हावर प्रीती केली म्हणून आम्ही देवावर आणि आपल्या सह विश्वासू बांधवावर प्रीती करतो. 20 म्हणून जो कोणी आपल्या एका सह विश्वासू बांधवाचा द्वेष करतो, आणि म्हणतो, “मी देवावर प्रीती करतो” तर तो लबाड आहे. ज्याला त्यांनी पाहिले आहे, अशा सह विश्वासू बांधवापैकी एकावर ते प्रीती करत नाहीत, तर ज्या देवाला त्यांनी पाहिले नाही, त्याच्यावर ते निश्चितच प्रीती करणार नाहीत. 21 देवाने आपल्याला जे आज्ञापिले ते हेच आहे हे लक्षात ठेवा: जर आम्ही त्याच्यावर प्रीती करतो तर आम्ही आपल्या सह विश्वासू बांधवांवर प्रीती केली पाहिजे.
Chapter 5
1 येशू हा ख्रिस्त आहे असा जे कोणी विश्वास ठेवतात ते सर्व देवापासून जन्मलेली, देवाची मुले आहेत. आणि जो कोणी पित्यावर प्रीती करतो, तर तो पित्याची मुले म्हणजे त्याच्या सह विश्वासू बांधवांवर, देखील प्रीती करतो. 2 जेव्हा आम्ही देवावर प्रीती करतो आणि देवाने आपल्याला जे काही करण्यासाठी आज्ञापिले ते आम्ही करतो, ह्या प्रकारे आपण खात्री करू शकतो की आम्ही देवाच्या मुलांवर खरोखर प्रीती करत आहोत. 3 कारण प्रेमळ देवासाठी ह्याचा अर्थ असा होतो की आम्ही तेच करावे जे त्याने आम्हाला आज्ञापिले आहे, असेही मी म्हणेन. आणि त्याने जे काही आज्ञापिले ते करणे काही कठीण नाही.
4 अविश्वासणाऱ्यांची इच्छा असते तसे करण्यासाठी नकार देणारी देवाची मुले होण्यासाठी त्याने आम्हा सर्वांना सक्षम केले आहे; देवाच्या विरूध्द असणाऱ्या सर्व गोष्टींपेक्षा आम्ही सामर्थ्यशाली आहोत. आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, म्हणून आम्ही चुकीचे करण्यासाठी नकार देऊ शकतो. 5 देवाच्या विरोधात असणाऱ्या सर्व गोष्टींपेक्षा कोण सामर्थ्यशाली आहे ती व्यक्ती कोण आहे? येशू हा देवाचा पुत्र आहे हे जो कबूल करतो तोच ती व्यक्ती आहे.
6 येशू ख्रिस्ताविषयी विचार करा. तोच एक आहे जो देवापासून पृथ्वीवर आले होता. देवाने खरोखर येशूला पाठवले होते हे त्याने, योहानाने पाण्यामध्ये येशूचा बाप्तिस्मा दिला तेव्हा, व येशूचा मृत्यु होत असता त्याच्या शरीरावरून रक्त वाहतांना देखील दाखवून दिले आहे. आणि येशू ख्रिस्त देवा पासून आला होता हे देवाच्या आत्म्याने विश्वासपूर्वक घोषित केले आहे. 7 ह्या तीन गोष्टी साक्षीदार असणाऱ्या तीन लोकांसारख्या आहेत: 8 देवाचा आत्मा, व जेव्हा योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला ते पाणी, आणि येशूचा वधस्तंभावर मृत्यु होत असता त्याच्या शरीरावरून वाहिलेले रक्त ह्या तिन्ही गोष्टी आम्हाला येशू देवापासून आला होता असे सांगतात.
9 इतर लोक आम्हाला काय सांगतात त्यावर आम्ही सामान्यपणे विश्वास ठेवतो. परंतु देव काय सांगतो त्यावर आम्ही निश्चितच त्यांच्यापेक्षा जास्त भरवसा ठेऊ शकतो. आणि त्याने निश्चितच त्याच्या पुत्रा विषयी साक्षही दिली आहे. 10 देवाच्या पुत्रावर जे कोणी विश्वास ठेवतात त्यांना त्याच्या विषयीचे सत्य आपल्या अंतःकरणात असल्याचे ठाऊक असते. परंतु देव काय सांगतो ह्यावर जे कोणी विश्वास ठेवत नाही त्यांना लबाड म्हणतात, कारण देवाने आपल्या पुत्रा विषयी काय साक्ष दिली ह्यावर विश्वास ठेवणे त्यांनी नाकारले आहे.
11 देव आमच्याशी काय बोलला ते हे आहे: “मी तुम्हाला सार्वकालीक जीवन दिले आहे!” जर आम्ही त्याच्या पुत्रा सोबत जोडलेले आहोत तर आम्ही सर्वकाळसाठी जगू. 12 देवाच्या पुत्रा सोबत जे कोणी जोडलेले आहेत ते देवाबरोबर सर्वकाळ जगतील. जे कोणी त्याच्यासोबत जोडलेले नाहीत ते सर्वकाळ जगणार नाहीत.
13 येशू हा देवाचा पुत्र आहे असे जे कबूल करतात त्या तुम्हाला माहीत व्हावे की तुम्ही सर्वकाळ जगणार आहात म्हणून मी हे पत्र तुम्हाला लिहिले आहे. 14 आम्ही त्याला काहीही करण्याची विनंती करतो तेव्हा तो ती मंजूर करतो कारण तो आमचे ऐकेल याची आम्हाला फार खात्री असते कारण आम्ही त्याच्याबरोबर जोडलेले आहेत. 15 आणि जेव्हा आम्ही त्याच्याकडे काहीतरी मागतो तर तो आमचे ऐकतो हे आम्हाला ठाऊक आहे, आम्ही त्याच्याकडे जे काही मागीतले ते तो करेल हे देखील आम्हाला ठाऊक आहे.
16 आपल्या सह विश्वासणाऱ्या बंधूपैकी एखाद्याला ज्याचा परिणाम देवापासून सार्वकालिकतेमध्ये वेगळे होणे नाही असे पाप करतांना कोणी पाहिले तर त्याने त्या विश्वासणाऱ्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी; परिणामी देव त्या सह विश्वासणाऱ्या बंधूला मदत करील आणि त्याला किंवा तिला सर्वकाळ जगण्यासाठी सक्षम करील. परंतु काही लोक अशा रीतीने पाप करतात परिणामी ते सर्वकाळासाठी देवापासून विभक्त होतात. तुम्ही देवाकडे प्रार्थना करून अशी पापे करणाऱ्या लोकांसाठी मदत मागितली पाहिजे असे मी म्हणत नाही. 17 प्रत्येकजण जे चूक आहे ते करतो तर तो पाप करत आहे, परंतु प्रत्येक वेळी त्याने केलेल्या पापामुळे तो व्यक्ती सर्वकाळासाठी देवापासून वेगळा होत नाही.
18 एखादी व्यक्ती जर देवाचे लेकरू आहे तर, तो वारंवार पाप करणार नाही हे आम्हाला ठाऊक आहे. सैतान, जो दुष्ट त्याने त्याला दुखापत करू नये म्हणून देव त्याचे संरक्षण करील. 19 आम्ही देवाचे आहोत हे आम्हाला ठाऊक आहे, आणि जगातील विश्वास न ठेवणारे सर्वजण त्या दुष्टाचे आहेत, हे देखील आम्हाला ठाऊक आहे.
20 देवाचा पुत्र आमच्यामध्ये आला आणि सत्य समजण्यासाठी त्याने आम्हाला सक्षम केले; देवाचा पुत्र येशू ख्रिस्त, जो सत्य आहे त्याच्याशी आम्ही जोडलेले आहोत, हे देखील आम्हाला ठाऊक आहे. येशू ख्रिस्त हा खरोखर देव आहे, आणि तोच एक आहे जो आम्हाला सार्वकालिक जीवन मिळविण्यास सक्षम करतो.
21 तुम्ही जे मला अतिप्रिय आहात त्या तुम्हाला मी असे म्हणतो, ज्यांना खरी शक्ती नाही अशा दैवतांची उपासना करण्यापासून स्वतःला सुरक्षीत ठेवा!